डॉ श्रीकांत कुलांगे
सायकॉलॉजिस्ट
माणसाच्या आयुष्यात भावना हा केंद्रबिंदू असतो. पण एक गोष्ट वास्तव आहे की प्रत्येकाला आपल्या भावनांचा समतोल साधणे सहज शक्य होत नाही. भावना असणे ही नैसर्गिक गोष्ट आहे, पण त्या कशा, कुठे आणि किती व्यक्त करायच्या हे समजणे ही एक वेगळी मानसिक कौशल्य आहे. अनेकदा समस्या भावनांमुळे निर्माण होत नाहीत, तर त्या व्यक्त करण्याच्या पद्धतीमुळे निर्माण होतात.
मानसशास्त्र सांगते की भावना व्यक्त करण्यालाही एक प्रकारची सामाजिक नीती असते. प्रत्येक भावनेला एक योग्य वेळ, योग्य जागा आणि योग्य पद्धत असते. उदाहरणार्थ, एखाद्याविषयीचा राग असेल तर तो प्रत्येकाच्या समोर उघडपणे व्यक्त करणे योग्य नसते. त्याचप्रमाणे एखाद्याबद्दलचा स्नेह किंवा कृतज्ञता मनात ठेवण्यापेक्षा योग्य क्षणी सांगितली तर नातं अधिक दृढ होतं. पण ही समज सर्वांमध्ये सारखी विकसित होत नाही.
काही लोक अतिशय संवेदनशील असतात. त्यांच्या भावना तीव्र असतात, पण त्या व्यक्त करण्याची योग्य पद्धत त्यांना माहीत नसते. त्यामुळे कधी भावना चुकीच्या वेळी बाहेर पडतात, कधी त्या इतक्या दडपल्या जातात की योग्य वेळी व्यक्तच होत नाहीत. दोन्ही परिस्थितीत गोंधळ निर्माण होतो. जे बोलायचे होते ते वेळेवर बोलले जात नाही, आणि जे बोलू नये ते चुकीच्या क्षणी बाहेर पडते.
समाजात भावना व्यक्त करण्याच्या अनेक पद्धती आहेत. काही लोक थेट बोलून भावना व्यक्त करतात, काही आपल्या वागण्यातून दाखवतात, तर काही लोक शांत राहूनही खूप काही सांगत असतात. पण जेव्हा या पद्धतींची जुळवाजुळव होत नाही, तेव्हा गैरसमज निर्माण होतात. एखाद्याला वाटते की समोरची व्यक्ती उदासीन आहे, पण प्रत्यक्षात ती व्यक्ती भावना व्यक्त करण्याबाबत संकोची असते. तर कधी एखाद्याचा थेटपणा दुसऱ्याला कठोरपणा वाटू शकतो.
अनेकदा नात्यांमध्ये निर्माण होणारे तणाव याच कारणामुळे असतात. भावना असतात, पण त्या योग्य वेळी आणि योग्य प्रकारे पोहोचत नाहीत. त्यामुळे शब्द आणि भावना यांच्यात अंतर निर्माण होते. समोरचा व्यक्ती आपला हेतू चुकीचा समजतो आणि हळूहळू गैरसमजांची साखळी तयार होते.
खरं तर भावनांचा समतोल म्हणजे भावना दाबून ठेवणे नव्हे. तो म्हणजे त्या समजून घेणे आणि योग्य पद्धतीने व्यक्त करणे. ज्या व्यक्तीला स्वतःच्या भावनांची जाणीव असते आणि त्या इतरांपर्यंत योग्य रीतीने पोहोचवता येतात, ती व्यक्ती नात्यांमध्ये अधिक स्पष्टता आणि विश्वास निर्माण करू शकते.
मानसिक परिपक्वता ही इथे महत्त्वाची ठरते. कारण भावनांना दिशा देणे म्हणजे स्वतःला समजून घेणे आणि समोरच्या व्यक्तीची मानसिकता ओळखणे. जेव्हा ही जाणीव वाढते, तेव्हा संवाद अधिक स्वच्छ होतो आणि गैरसमज कमी होतात.
शेवटी माणसाच्या भावना या त्याच्या मनाचा आवाज असतात. पण हा आवाज कसा आणि कुठे ऐकवायचा हे समजले, तरच त्या भावनांना योग्य अर्थ मिळतो. अन्यथा भावना असतानाही नाती दूर जातात, आणि अनेकदा गैरसमजांच्या सावलीत खऱ्या भावना हरवून जातात.
®मनस्वी सायकॉलॉजी अँड वेलनेस
7758942278
www.themanaswi.com
