Manaswi

मन जे मानतं, शरीर ते घडवतं

मन जे मानतं, शरीर ते घडवतं
©डॉ श्रीकांत कुलांगे
मानसोपचार तज्ज्ञ

आपण रोज सकाळी उठतो तेव्हा फक्त शरीर उठत नाही, तर आपल्या मनातली एक ठराविक भूमिका देखील जागी होते. “आज दम लागतोय”, “आज मूड नाही”, “आता माझ्याकडून हे शक्य नाही” असे विचार नकळत मनात फिरू लागतात. गंमत अशी की शरीर या विचारांना आदेश समजून प्रतिसाद देतं. मानसशास्त्र सांगतं की मन आणि शरीर वेगवेगळे घटक नाहीत; ते एकमेकांशी सतत संवाद साधत असतात.

चालता बोलता आपण एखाद्याला उगीचच “तू म्हातारा दिसायला लागलास” किंवा “साठी आलीय, आता पुढे काय?” असे इतरांना बोलतो किंवा इतर आपल्या बोलतात तेंव्हा मनात चलबिचल व्हायला लागते. प्रत्यक्षात आपण जरी पन्नाशीत असलो तरी असे बोलणे आपल्या मेंदूला सूचना देऊन जातात की आपण आता म्हातारे झालोत. त्याचवेळी आपण जर तरुणांच्या सहवासात राहिलो आणि ते आपल्याला तरुणपणीच्या आठवणी जाग्या करून देत असतील तर आपलं शरीर आणि मन तरुण होतं.

आपली स्वतःबद्दलची प्रतिमा म्हणजे आपण स्वतःला दिलेली एक अंतर्गत ओळख असते. काही लोक स्वतःला कायम थकलेले, दुर्बल किंवा दुय्यम समजतात. अशा मानसिकतेत जगताना चालण्याची गती कमी होते, निर्णय घेण्याची हिंमत कमी होते आणि शरीरही जणू त्याच मर्यादांमध्ये अडकतं. याउलट, स्वतःला सक्रिय, उपयोगी आणि शिकणारा समजणारी व्यक्ती नैसर्गिकपणे अधिक हलती राहते, अधिक संवाद साधते आणि नव्या गोष्टी स्वीकारायला तयार असते.

हे नातं फक्त मानसिक पातळीवर थांबत नाही. झोपेची गुणवत्ता, भूक, ऊर्जा, पचन, स्नायूंचा ताण, सगळं काही मनाच्या स्थितीशी जोडलेलं असतं. एखादी व्यक्ती सतत काळजीत राहते, तर तिची झोप उडते, पचन बिघडतं आणि थकवा वाढतो. दुसरीकडे, मन शांत आणि स्थिर असेल, तर शरीरही अधिक संतुलित काम करतं.

दैनंदिन आयुष्यात आपण याची अनेक उदाहरणं पाहतो. एखाद्या व्यक्तीला डॉक्टरांनी “तुम्हाला फार काळजी घ्यावी लागेल” असं सांगितलं, तर ती व्यक्ती लगेचच स्वतःला आजारी समजू लागते. चालताना जपून चालते, जास्त हालचाल टाळते, मनात सतत भीती ठेवते. काही वेळा प्रत्यक्ष आजारापेक्षा मानसिक भीतीच शरीराला अधिक मर्यादित करते. याउलट, काही लोक आजार असूनही स्वतःला सक्षम समजतात, योग्य काळजी घेतात, पण आयुष्य थांबवत नाहीत. त्यांची रिकव्हरी देखील तुलनेने चांगली दिसते.

समाजही आपल्याला काही ठराविक चौकटी देतो. विशिष्ट वय म्हणजे काय करायचं आणि काय करू नये, कोणत्या टप्प्यावर ऊर्जा कमी होते, कोणत्या टप्प्यावर जोखीम घेऊ नये, हे सगळं आपण नकळत स्वीकारतो. मानसशास्त्र सांगतं की माणूस ज्या कथेत स्वतःला बसवतो, त्याच कथेप्रमाणे तो जगू लागतो. कथा बदलली की वर्तन बदलतं, आणि वर्तन बदललं की शरीराची सवयही बदलते.

याचा अर्थ असा नाही की फक्त सकारात्मक विचार करून सगळे शारीरिक प्रश्न मिटून जातात. वास्तव नाकारणं हे आरोग्यदायी नाही. पण स्वतःबद्दलची अंतर्गत भाषा अधिक समर्थ, समजूतदार आणि आशावादी झाली, तर शरीराला मिळणारे संदेशही अधिक सकारात्मक होतात. स्वतःशी आपण ज्या शब्दांत बोलतो, तीच भाषा मेंदू शरीराला ऐकवतो.

शेवटी प्रश्न इतकाच आहे, आपण स्वतःला रोज कोणती कथा सांगतो? “मी थकलो आहे, माझ्याकडून होत नाही” अशी कथा, की “मी शिकतोय, हळूहळू पुढे जातोय” अशी कथा? मन ज्या दिशेने चालतं, शरीर त्या दिशेने पाऊल टाकतं. म्हणूनच मानसिक आरोग्य म्हणजे केवळ समस्या दूर करणं नाही, तर स्वतःशी असलेला संवाद अधिक जागरूक, सकारात्मक आणि वास्तवाशी जोडलेला बनवणं होय. मन मजबूत झालं की शरीरही त्या ताकदीला प्रतिसाद द्यायला सुरुवात करतं.
®मनस्वी सायकॉलॉजी अँड वेलनेस
☎️7758942278

Leave A Comment

call us