संस्कृत श्लोक, जप आणि आपलं मन
©डॉ श्रीकांत कुलांगे
मानसोपचार तज्ज्ञ
सकाळी किंवा संध्याकाळी कुणीतरी शांतपणे श्लोक म्हणताना आपण पाहतो. कुणी जप करत असतो, कुणी हळू आवाजात मंत्रोच्चार करत असतो. अनेकदा क्लायंट म्हणतात की, “जप केल्यावर मन हलकं होतं,” “डोक्यातील गोंधळ कमी होतो,” “झोप चांगली लागते.” मग हा अनुभव फक्त श्रद्धेचा भाग आहे का, की यामागे मानसशास्त्रीय आणि शास्त्रीय कारणं आहेत?
मानसशास्त्र सांगतं की आपलं मन सतत विचारांच्या गर्दीत असतं. कामाचा ताण, नात्यांचे प्रश्न, भविष्याची चिंता, भूतकाळातील आठवणी या सगळ्यामुळे मेंदू कायम ‘ऑन’ मोडमध्ये असतो. जप करताना मात्र मनाला एक ठराविक आधार मिळतो. शब्द, लय, उच्चार आणि श्वास यावर लक्ष केंद्रित झालं की विचारांची गती आपोआप मंदावते. मन वर्तमान क्षणात येतं आणि त्यातून शांततेचा अनुभव तयार होतो.
जप हा फक्त मानसिक प्रक्रिया नाही, तो शरीरालाही परिणाम करतो. मंत्र म्हणताना श्वास खोल आणि नियमित होतो. यामुळे शरीरातील ताण कमी होण्यास मदत होते. हृदयाचे ठोके स्थिर होतात, स्नायूंमधील घट्टपणा कमी होतो आणि मज्जासंस्थेला “आता सुरक्षित आहे, शांत व्हायचं आहे” असा संदेश मिळतो. त्यामुळे अनेकांना जपानंतर हलकेपणा, स्थैर्य आणि सकारात्मकता जाणवते.
भावनिक पातळीवर जप एक आधार देतो. एखादा श्लोक किंवा मंत्र आपल्यासाठी अर्थपूर्ण असतो. त्याच्याशी आठवणी, श्रद्धा, किंवा अंतर्मनातील मूल्यं जोडलेली असतात. त्यामुळे जप करताना मनाला सुरक्षिततेची भावना मिळते. काही लोकांसाठी समूहात श्लोक पठण करणे हे सामाजिक जोड निर्माण करतं, एकटेपणाची भावना कमी करतं आणि भावनिक आधार देतं. मानसिक आरोग्यात सामाजिक नात्यांची भूमिका फार महत्त्वाची असते, हे मानसशास्त्र वारंवार highlight करतं.
रिसर्च काय सांगतो याकडे पाहिलं तर मंत्राधारित ध्यानावर अनेक अभ्यास झाले आहेत. काही systematic reviews आणि meta-analysis मध्ये असे आढळते की नियमित मंत्र ध्यानामुळे ताण, चिंता आणि मूडशी संबंधित लक्षणांमध्ये मध्यम प्रमाणात सुधारणा होऊ शकते. हे परिणाम सर्वांसाठी सारखे नसतात, पण अनेक लोकांना त्याचा लाभ होतो असे संशोधन सांगते.
“ॐ” चांटिंगवर केलेल्या काही अभ्यासांमध्ये शरीरातील parasympathetic nervous system सक्रिय झाल्याचे संकेत मिळतात. म्हणजे शरीर रिलॅक्सेशन मोडमध्ये जातं. हृदयाच्या ठोक्यांमधील बदल, श्वासाची लय आणि शरीरातील शांतता यामध्ये सकारात्मक बदल दिसून येतात. याचा अर्थ असा की जप हा केवळ मानसिक नव्हे तर जैविक पातळीवरही परिणाम करतो.
मेंदूच्या कार्यावर झालेल्या काही न्यूरोसायन्स अभ्यासांमध्ये असे दिसते की जप किंवा चांटिंग करताना मेंदूतील default mode network ची सक्रियता कमी होऊ शकते. हे नेटवर्क सतत विचार करणे, मन भटकणे आणि आत्मसंवाद यांच्याशी संबंधित असते. त्यामुळे जप करताना “विचार शांत होतात” हा अनुभव वैज्ञानिकदृष्ट्याही समजावून सांगता येतो.
ताणाशी संबंधित हार्मोन म्हणजे cortisol. Meditation आधारित पद्धतींमुळे काही लोकांमध्ये cortisol पातळी कमी झाल्याचेही संशोधनात दिसते. म्हणजे शरीरातील ताणाची जैविक पातळी कमी होण्याची शक्यता असते. ही प्रक्रिया लगेच जादूसारखी घडत नाही, पण नियमित सरावाने बदल दिसू शकतात.
इथे एक महत्त्वाची स्पष्टता आवश्यक आहे. “संस्कृत भाषा स्वतःच मेंदू बदलते” असा ठोस वैज्ञानिक दावा अजून सिद्ध झालेला नाही. ज्या गोष्टींचे पुरावे मजबूत आहेत त्या म्हणजे पुनरावृत्ती, लक्ष केंद्रित करणे, श्वासाची लय, भावनिक अर्थ आणि सातत्य. संस्कृत श्लोक असो किंवा कुठल्याही भाषेतील मंत्र असो, मुख्य परिणाम या घटकांमुळे तयार होतो. त्यामुळे अंधश्रद्धेपेक्षा समजूतदार दृष्टिकोन ठेवणे अधिक योग्य ठरेल.
जप आणि श्लोक पठण हे सौम्य ताण, ओव्हरथिंकिंग, अस्वस्थता, झोपेचे प्रश्न यामध्ये उपयोगी ठरू शकतात. मात्र तीव्र डिप्रेशन, पॅनिक अटॅक, ट्रॉमा किंवा गंभीर मानसिक आजारांमध्ये फक्त जपावर अवलंबून राहणे योग्य नाही. अशा वेळी व्यावसायिक मानसोपचार आणि वैद्यकीय मदत आवश्यक असते. जप हा उपचाराचा पर्याय नसून उपचाराला पूरक अशी एक सशक्त सवय आहे.
आजच्या धावपळीच्या जगात मन शांत ठेवणं ही एक कौशल्य बनली आहे. संस्कृत श्लोक, जप आणि पठण हे त्या कौशल्याचा सराव करण्याची एक सुंदर, सहज आणि संस्कृतीशी जोडलेली पद्धत ठरू शकते. श्रद्धा असो वा नसो, मनाशी मैत्री करण्याचा हा एक मार्ग आहे, एवढं नक्की.
®मनस्वी सायकॉलॉजी अँड वेलनेस
☎️7758942278
