Manaswi

वटवृक्ष

 

डॉ श्रीकांत कुलांगे

सायकॉलॉजिस्ट

( _आजचा लेख हा सामजिक आणि मानसिक भूमिकेतून लिहिला आहे_ .)

कुटुंब ही केवळ नात्यांची साखळी नसते, ती एक जिवंत सामाजिक आणि मानसिक व्यवस्था असते. त्या व्यवस्थेला दिशा देणारी, स्थैर्य देणारी आणि संकटाच्या वेळी सर्वांना एकत्र बांधून ठेवणारी जी व्यक्ती असते, तिला आपण कुटुंबप्रमुख म्हणतो. अनेक घरांमध्ये ही भूमिका वडील पार पाडताना दिसतात, तर काही घरांमध्ये आईही तितक्याच समर्थपणे ही जबाबदारी निभावत असते. काळ पुढे सरकत जातो तसे हेच आई-वडील आजी-आजोबा होतात आणि त्यांच्या अनुभवाची सावली संपूर्ण कुटुंबावर पसरते. त्यामुळे कुटुंबप्रमुख हा केवळ अधिकाराचा केंद्रबिंदू नसतो, तर तो कुटुंबाच्या भावनिक समतोलाचा आधार असतो.

मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर कुटुंबामध्ये अशी एक स्थिर व्यक्ती असणे ही प्रत्येक सदस्यासाठी भावनिक सुरक्षिततेची भावना निर्माण करते. जीवनात संकटे येतात, मतभेद निर्माण होतात, परिस्थिती बदलते. अशा वेळी अनुभवाने समृद्ध असलेली व्यक्ती मार्गदर्शन करते ही जाणीव कुटुंबाला मानसिक स्थैर्य देते. कुटुंबप्रमुख अनेकदा वटवृक्षासारखा असतो. तो स्वतः स्थिर राहतो आणि इतरांना सावली देत राहतो. परंतु वटवृक्ष टिकून राहण्यासाठी त्याची काळजी घेणे आवश्यक असते. कुटुंबातील प्रत्येक सदस्याने त्या व्यक्तीच्या भावनिक गरजांची जाणीव ठेवली आणि त्याच्या अनुभवाचा सन्मान केला तरच ही व्यवस्था निरोगी राहू शकते.

परंतु आज अनेक कुटुंबांमध्ये ही व्यवस्था हळूहळू ढासळताना दिसते. यामागे अनेक सामाजिक आणि मानसिक कारणे आहेत. समाजात वाढलेला बाह्य प्रभाव, बदलत्या मूल्यांचा धुमाकुळ आणि व्यक्तिकेंद्री जीवनशैली यामुळे कुटुंबाची सामूहिकता कमी होत आहे. प्रत्येक जण स्वतःच्या आयुष्यात व्यस्त आहे. व्यस्त जीवनशैलीमुळे एकत्र बसून संवाद साधणे, मन मोकळे करणे किंवा एकमेकांना समजून घेणे या गोष्टी कमी होत आहेत. संवाद कमी झाला की गैरसमज वाढतात आणि नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो.

ताण, स्पर्धा आणि सततच्या अपेक्षांमुळे मानसिक असंतुलन देखील वाढताना दिसते. जेव्हा व्यक्ती स्वतःच्या भावनांशी समतोल साधू शकत नाही, तेव्हा ती कुटुंबातील नातेसंबंधांमध्येही अस्थिरता निर्माण करू शकते. काही वेळा लोक भावनिकदृष्ट्या बधिर होतात. त्यांना इतरांच्या भावना समजून घेण्याची किंवा त्यांना प्रतिसाद देण्याची संवेदनशीलता कमी होते. अशा परिस्थितीत कुटुंबातील नाते केवळ औपचारिक राहतात.

पाहण्याचा दृष्टीकोन हा देखील महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येक पिढीचा विचार वेगळा असतो. जुन्या पिढीकडे अनुभव असतो, तर नव्या पिढीकडे बदलाची ऊर्जा असते. या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक ठरू शकतात. पण जेव्हा समजून घेण्याची तयारी नसते तेव्हा संघर्ष वाढतो. त्यातच संकुचित वृत्ती आणि इगो या गोष्टी नात्यांमध्ये अधिक ताण निर्माण करतात. अनेक वेळा लोकांना आपले मतच योग्य वाटते आणि संवाद थांबतो. नाते जपण्यापेक्षा स्वतःचा अहंकार जपण्याची प्रवृत्ती वाढते.

आर्थिक परिस्थिती देखील कुटुंबाच्या व्यवस्थेला प्रभावित करते. आर्थिक टंचाई असेल तर ताण वाढतो, अपेक्षा पूर्ण होत नाहीत आणि त्यामुळे मतभेद निर्माण होतात. परंतु केवळ अभावच नव्हे तर आर्थिक सुबत्ता देखील कधी कधी नात्यांमध्ये अंतर निर्माण करते. पैसा वाढला की जीवनशैली बदलते, व्यक्तिवाद वाढतो आणि कुटुंबाची सामूहिकता कमी होऊ शकते. त्यामुळे आर्थिक स्थिती काहीही असो, भावनिक जोड आणि संवाद यांची गरज कायम राहते.

कुटुंबप्रमुखाच्या निधनानंतर ही परिस्थिती अधिक स्पष्ट दिसते. कारण अनेक कुटुंबांमध्ये पुढे कोण ही भूमिका स्वीकारणार याची तयारी नसते. नेतृत्वाची साखळी तयार झालेली नसते. त्यामुळे कुटुंबातील समन्वय कमी होतो आणि व्यवस्था विस्कळीत होऊ लागते. खरं पाहिलं तर कुटुंबप्रमुख ही केवळ व्यक्ती नसून एक भूमिका आहे. त्या भूमिकेमध्ये अनुभव, संयम, जबाबदारी आणि मार्गदर्शन यांचा समतोल असतो.

आजच्या काळात या सगळ्या परिस्थितीकडे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. कुटुंबामध्ये संवाद तुटला, मतभेद वाढले किंवा भावनिक अंतर निर्माण झाले तर त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी समजून घेण्याची गरज आहे. येथे कौटुंबिक समुपदेशन अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकते. अनेक वेळा कुटुंबातील सदस्यांना एकमेकांचे विचार, भावना आणि अपेक्षा समजून घेण्यासाठी एक तटस्थ आणि समजूतदार मार्गदर्शकाची गरज असते. समुपदेशनाच्या माध्यमातून संवाद पुन्हा सुरू होऊ शकतो, गैरसमज कमी होऊ शकतात आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याची भूमिका अधिक स्पष्ट होऊ शकते.

समाजात अजूनही समुपदेशनाकडे अनेकदा गैरसमजाने पाहिले जाते. लोकांना वाटते की समुपदेशन म्हणजे केवळ मोठ्या समस्यांसाठी असते. प्रत्यक्षात ते नातेसंबंध अधिक समजून घेण्यासाठी, संवाद सुधारण्यासाठी आणि मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी अत्यंत उपयुक्त साधन आहे. आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत कुटुंबांनी मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून स्वतःकडे पाहण्याची आणि गरज वाटल्यास समुपदेशनाचा स्वीकार करण्याची तयारी ठेवणे आवश्यक आहे.

कुटुंब हा समाजाचा पाया आहे. त्या पायामध्ये स्थैर्य टिकून राहण्यासाठी परस्पर आदर, संवाद, समज आणि भावनिक संवेदनशीलता आवश्यक आहे. कुटुंबप्रमुख हा वटवृक्षासारखा असतो, पण त्या वटवृक्षाच्या सावलीचे मूल्य ओळखणे आणि त्या सावलीला पुढील पिढीत जपणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. जे कुटुंब हे समजून घेतात, तेथे नात्यांची मुळे अधिक मजबूत राहतात आणि मानसिक आरोग्याचा आधारही अधिक स्थिर राहतो.

®मनस्वी सायकॉलॉजी अँड वेलनेस

☎️7758942278

www.themanaswi.com

Leave A Comment

Call Us Now
WhatsApp
error

Enjoy this blog? Please spread the word :)

RSS
YouTube
Instagram
WhatsApp
call us