डॉ श्रीकांत कुलांगे
सायकॉलॉजिस्ट
एक प्रश्न होता “कुठल्या गुणांची माणसं आपल्या भोवती असावीत?”. म्हणजे आपण निवड गुणांवर करतोय, व्यक्तीवर नाही. सर्वबाजूनी योग्य प्रश्न, विचार करायला लावणारा.
आपण लहानपणापासून एक छोटी कल्पना मनात बाळगतो. कुठेतरी एक आदर्श व्यक्ती आहे. पूर्ण समजून घेणारी, कधीही चूक न करणारी, कायम शांत, नेहमी योग्य निर्णय घेणारी. नात्यांत, मैत्रीत, नेतृत्वात, अगदी स्वतःबद्दलही आपण हीच अपेक्षा ठेवतो. प्रश्न इतकाच की ही अपेक्षा मानवी आहे का?
मानसशास्त्र सांगतं की माणूस हा स्थिर साचा नाही. तो प्रवाही आहे. परिस्थिती, अनुभव, जैविक प्रवृत्ती, बालपणातील संगोपन/वाढ, सामाजिक दबाव, यश-अपयश, आघात आणि शिकलेले धडे या सगळ्यांचा परिणाम त्याच्या वागणुकीवर होत असतो. एखादी व्यक्ती एका संदर्भात अत्यंत संयमी असू शकते, पण दुसऱ्या संदर्भात असुरक्षित. कामाच्या ठिकाणी निर्णयक्षम, पण वैयक्तिक आयुष्यात गोंधळलेली. मग आपण तिला कोणत्या मापदंडाने परफेक्ट म्हणायचं?
मानवी मेंदू स्वतःच मर्यादित आहे. आपण संपूर्ण माहितीशिवाय निर्णय घेतो. आपल्या निर्णयांवर भावना परिणाम करतात. पूर्वग्रह असतात. कधी भीती, कधी अहंकार, कधी प्रेम, कधी अपराधीपण. आपण तर्क आणि भावना यांचं मिश्रण आहोत. त्यामुळे चुका होणं ही अपवादात्मक गोष्ट नाही, ती मानवी असण्याचा भाग आहे.
परफेक्शनची कल्पना बहुतेक वेळा नियंत्रणाच्या गरजेतून येते. जर समोरचा माणूस निर्दोष असेल, तर आपल्याला सुरक्षित वाटेल अशी एक अवास्तव आशा असते. पण वास्तवात सुरक्षितता ही व्यक्तीच्या निर्दोषतेत नसते, तर नात्यातील प्रामाणिकपणा आणि जबाबदारीत असते. चूक झाली तरी ती मान्य करण्याची तयारी, दुखावलं गेलं तर संवाद करण्याची क्षमता, मतभेद असले तरी नातं टिकवण्याची इच्छाशक्ती. हे गुण परफेक्शनपेक्षा जास्त महत्त्वाचे असतात.
एक महत्त्वाचा मानसशास्त्रीय पैलू असा की आपण इतरांकडून जे अपेक्षित ठेवतो, तेच अनेकदा स्वतःबद्दलही बाळगतो. स्वतःला परिपूर्ण सिद्ध करण्याच्या धडपडीत आपण सतत ताणात राहतो. स्वतःची तुलना करतो. छोट्या चुका मोठ्या अपयशासारख्या वाटू लागतात. आत्ममूल्य कामगिरीशी जोडले जाते. अशा वेळी “परफेक्ट नसणं” ही कमतरता नसून वास्तवाची स्वीकृती आहे हे समजणं मानसिक आरोग्यासाठी आवश्यक ठरतं.
नात्यांमध्येही हेच लागू होतं. जेव्हा आपण एखाद्याला आदर्श बनवतो, तेव्हा प्रत्यक्ष व्यक्तीशी नव्हे तर आपल्या कल्पनेशी आपण जोडलेले असतो. आणि जेव्हा ती व्यक्ती आपल्या अपेक्षेप्रमाणे वागत नाही, तेव्हा निराशा, राग, तुटणं हे अपरिहार्य ठरतं. कारण आपण व्यक्तीला स्वीकारलं नव्हतं, आपण कल्पना स्वीकारली होती.
मानवी सौंदर्य हे अपूर्णतेत आहे. एखाद्याची हट्टी वृत्ती कधी चिकाटीत रूपांतरित होते. एखाद्याची संवेदनशीलता कधी सखोल सहानुभूती बनते. एखाद्याची असुरक्षितता त्याला अधिक मानवी बनवते. दोष आणि गुण हे वेगळे कप्पे नसतात. ते एकाच व्यक्तिमत्त्वाच्या छटा असतात.
परफेक्ट माणसं अस्तित्वात नाहीत, पण प्रामाणिक माणसं असतात. शिकण्याची तयारी असलेली माणसं असतात. स्वतःच्या मर्यादा मान्य करणारी आणि तरीही वाढण्याचा प्रयत्न करणारी माणसं असतात. कदाचित आदर्श शोधण्यापेक्षा अशा प्रवासात असलेल्या माणसांना आपल्या आयुष्यात स्थान देणं अधिक शहाणपणाचं आहे.
शेवटी प्रश्न असा उरतो की आपल्याला परिपूर्णता हवी आहे की प्रामाणिकता? कारण पहिली कल्पना आहे, दुसरं वास्तव आहे.
® _मनस्वी सायकॉलॉजी अँड वेलनेस._
☎️7758942278
www.themanaswi.com
