Manaswi

क्षमाशीलता

डॉ श्रीकांत कुलांगे
मानसोपचार तज्ज्ञ

“ तेरा मुझसे है पहले का नाता कोई…” (आ गले लग जा मूव्ही)

ही ओळ नात्यांच्या खोलपणाबद्दल बोलते. जेव्हा नातं इतकं जुडलेलं असतं, तेव्हा राग धरून ठेवणं मनाला जड जातं. क्षमा म्हणजे कधी कधी त्या नात्याच्या मुळाशी परत जाण्याचा प्रयत्न असतो. भूतकाळातील वेदना मान्य करतानाही नात्याची किंमत ओळखणं.

“Forgiveness isn’t always easy, but it can help you flourish” ही गोष्ट खूप साधी आहे, पण जगायला कठीण आहे. आपल्याला कुणी दुखावलं, अपमान केला, फसवलं की मनात राग येतो. तो राग अगदी नैसर्गिक आहे. पण प्रश्न असा आहे की तो राग आपण किती काळ धरून ठेवतो?

आपण अनेकदा म्हणतो, “मी त्याला कधीच माफ करणार नाही.” त्या क्षणी ते बरोबरही वाटतं. पण काही दिवसांनी लक्षात येतं की त्या घटनेपेक्षा त्या आठवणीने आपल्याला जास्त त्रास दिला आहे. आपण पुन्हा पुन्हा तोच प्रसंग आठवतो, मनात संवाद करतो, राग वाढवत राहतो. समोरचा माणूस आपलं आयुष्य जगत असतो, आणि आपण मात्र आतून कुरतडत राहतो.

मानसशास्त्रात झालेल्या संशोधनातून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. ज्या लोकांनी हळूहळू क्षमा करायला शिकलं, त्यांच्यात तणाव कमी झाला, झोप सुधारली आणि मन अधिक शांत झालं. राग धरून ठेवला की शरीरात तणाव वाढतो. रक्तदाब वाढू शकतो, चिडचिड वाढते, नात्यांमध्ये कटुता येते. क्षमा केली की समस्या लगेच नाहीशी होत नाही, पण मनावरचा भार कमी होतो.

इथे एक गैरसमज दूर करायला हवा. क्षमा म्हणजे विसरणे नाही. चुकीला योग्य ठरवणे नाही. आणि पुन्हा पुन्हा स्वतःला दुखावू देणे तर अजिबात नाही. क्षमा म्हणजे आपण ठरवतो की हा राग मी कायम बाळगणार नाही. मी स्वतःच्या मन:शांतीला जास्त महत्त्व देणार. काही वेळा क्षमा करताना अंतर ठेवणंही गरजेचं असतं. सीमा आखणं आणि क्षमा करणं हे एकत्र शक्य असतं.

Robert Enright आणि Everett Worthington यांसारख्या संशोधकांनी दाखवून दिलं आहे की जाणीवपूर्वक क्षमा करण्याचा सराव केल्याने नैराश्य आणि चिंतेची लक्षणे कमी होऊ शकतात. म्हणजेच क्षमा ही फक्त नैतिक शिकवण नाही, तर मानसिक आरोग्यासाठी उपयोगी सवय आहे.

आपण भूतकाळ बदलू शकत नाही. पण त्या भूतकाळाचा आपल्या वर्तमानावर किती प्रभाव असावा हे आपण ठरवू शकतो. राग धरून ठेवला तर आपण त्या व्यक्तीला आपल्या मनात कायम जागा देतो. क्षमा केली की ती जागा आपण स्वतःसाठी मोकळी करतो.

सोपं नाही. काही जखमा खोल असतात. वेळ लागतो. कधी कधी व्यावसायिक समुपदेशनाची मदतही लागते. पण हळूहळू, थोडं थोडं सोडायला शिकलं की मन हलकं होतं. आणि हलकं मन असलं की माणूस अधिक चांगलं जगू शकतो.

शेवटी, क्षमा ही दुसऱ्याला दिलेली सूट नसते. ती स्वतःला दिलेली मुक्ती असते. आणि ही मुक्तीच माणसाला आतून फुलायला मदत करते.

“मनाशी मन जुळावे, हेच खरे नाते…”

खरी जुळवाजुळव मनांची असते. आणि मनं जुळवायची असतील, तर कधीतरी कुणाला तरी माफ करावंच लागतं.
® मनस्वी सायकॉलॉजी अँड वेलनेस
☎️7758942278
www.themanaswi.com

Leave A Comment

Call Us Now
WhatsApp
error

Enjoy this blog? Please spread the word :)

RSS
YouTube
Instagram
WhatsApp
call us