©डॉ श्रीकांत कुलांगे
मानसोपचार तज्ज्ञ
माणसाचं आयुष्य म्हणजे सतत चालणारा एक आतला खेळ आहे. या खेळात दोन प्रमुख खेळाडू असतात – इच्छा आणि अपेक्षा. इच्छा आपल्याला पुढे चालायला प्रेरणा देते, तर अपेक्षा त्या प्रवासात आपण काय मिळवायचं, कसं मिळवायचं याचं चित्र रंगवते. समस्या तेव्हा सुरू होते, जेव्हा ही चित्रं वास्तवाशी जुळत नाहीत.
एक तरुण मुलगा आहे. त्याला चांगली नोकरी मिळावी ही त्याची इच्छा आहे. तो अभ्यास करतो, प्रयत्न करतो, मुलाखती देतो. ही इच्छा आरोग्यदायी आहे, कारण ती त्याला मेहनतीकडे नेते. पण मनात नकळत एक अपेक्षा तयार होते की “माझी पहिल्याच प्रयत्नात मोठ्या पॅकेजची नोकरी लागलीच पाहिजे.” जेव्हा तसे होत नाही, तेव्हा निराशा, राग, स्वतःवरचा विश्वास कमी होतो. इथे अपयश वेदनादायक ठरतं कारण इच्छा नव्हे, तर अतिउच्च अपेक्षा तुटते.
अनेकदा आपण नात्यांमध्येही हा खेळ अनुभवतो. एखादी पत्नी पतीकडून प्रेमाची अपेक्षा करते. तिची इच्छा असते की दोघांमध्ये संवाद असावा, वेळ एकमेकांसाठी असावा. पण अपेक्षा अशी होते की समोरच्याने माझ्या मनातलं न बोलताच समजून घ्यावं. जेव्हा तसं होत नाही, तेव्हा “तो मला समजत नाही” अशी भावना तयार होते. प्रत्यक्षात समोरचा माणूस वेगळ्या पद्धतीने प्रेम व्यक्त करत असतो, पण आपल्या अपेक्षेच्या चौकटीत तो बसत नाही म्हणून संबंध ताणले जातात.
मानसशास्त्रात इच्छा ही प्रेरणेशी जोडलेली असते, तर अपेक्षा ही मनाने बांधलेली कल्पना असते. इच्छा लवचिक असते, परिस्थितीनुसार बदलू शकते. अपेक्षा मात्र कडक असते. ती पूर्ण झाली तर आनंद, नाही झाली तर दुःख. म्हणूनच अनेक वेळा आपण वास्तवापेक्षा आपल्या अपेक्षांशी जास्त झुंज देत असतो.
एका शेतकऱ्याचं उदाहरण घ्या. त्याची इच्छा आहे की यावर्षी चांगलं पीक यावं. तो मेहनत करतो, योग्य खत वापरतो, पाणी नियोजन करतो. पण अपेक्षा अशी बांधतो की पावसाने अचूक वेळेला यायलाच हवं. निसर्गाने थोडा उशीर केला, की मनात अस्वस्थता, चिडचिड सुरू होते. हवामानावर नियंत्रण नसतानाही अपेक्षा ठेवली जाते, आणि मग मानसिक ताण वाढतो.
इच्छा आपल्याला वाढायला मदत करते, पण अपेक्षा कधी कधी आपल्याला आतून अडकवते. खूप अपेक्षा असलेली व्यक्ती सतत तुलना करत राहते, स्वतःला कमी लेखते किंवा इतरांवर दोष टाकते. याउलट, ज्याची अपेक्षा लवचिक असते, तो बदल स्वीकारतो, अनुभवातून शिकतो आणि मानसिकदृष्ट्या अधिक स्थिर राहतो.
याचा अर्थ असा नाही की अपेक्षा ठेवायच्याच नाहीत. अपेक्षा असणं मानवी आहे. पण त्या वास्तवाशी जोडलेल्या, परिस्थितीला समजून घेतलेल्या असाव्यात. “मला प्रयत्न करायचा आहे” ही इच्छा आरोग्यदायी आहे. “माझ्याच पद्धतीने सगळं घडलं पाहिजे” ही अपेक्षा तणाव निर्माण करते.
म्हणूनच जीवनात इच्छांना दिशा द्यायला हवी आणि अपेक्षांना थोडं मोकळं सोडायला हवं. इच्छा आपल्याला पुढे नेतात, तर अपेक्षा आपल्याला बांधून ठेवू शकतात. जेव्हा आपण अपेक्षांऐवजी प्रयत्नांवर, शिकण्यावर आणि अनुभवांवर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा मन अधिक शांत, स्थिर आणि समाधानी राहतं. जीवनाचा खेळ तेव्हाच सुंदर होतो, जेव्हा इच्छा प्रेरणा देते आणि अपेक्षा आपल्यावर राज्य करत नाहीत.
® मनस्वी सायकॉलॉजी अँड वेलनेस
☎️7758942278
