Manaswi

हतबलता – आपल्या नात्यांना, परिस्थितीला तोंड देता देता

  • Home
  • Manaswi
  • हतबलता – आपल्या नात्यांना, परिस्थितीला तोंड देता देता

आपल्या नात्यांना, परिस्थितीला तोंड देता देता आयुष्य निरस वाटू लागलंय अशी भावना घेऊन अनेक क्लायंट येत असतात.

जीवनात प्रत्येक व्यक्ती काही ना काही अडचणींना, अडथळ्यांना आणि तणावपूर्ण परिस्थितींना सामोरे जाते. काही जण या परिस्थितीला शांतपणे तोंड देतात, तर काही जण त्यात पूर्णपणे हतबल होतात. “हतबलता” म्हणजे केवळ निराशा नाही, तर मानसिक अशक्ततेचा असा टप्पा जिथे व्यक्तीला स्वतःवर, परिस्थितीवर किंवा भविष्यावर विश्वास उरत नाही. यावर मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करणे आवश्यक आहे.

हतबलतेची मानसिक लक्षणे दिसून येतात.

1. नियंत्रण हरवले असल्याची भावना. व्यक्तीला असे वाटते की तिच्या हातात काहीच उरलेले नाही. प्रत्येक निर्णय चुकीचा जाईल अशी भीती मनात बसते.
2. अंतर्गत संभ्रम आणि अपराधीपणा. “मी हे का केलं?”, “माझ्यामुळेच असं झालं” अशा विचारांमुळे आत्मग्लानी वाढते.
3. निष्क्रियता आणि निर्णय घेण्यास भीती. काहीही करण्याची इच्छाच उरत नाही. “काय उपयोग?” असा विचार प्रत्येक कृतीच्या आधी येतो.
4. शारीरिक थकवा आणि निद्रानाश. हतबल व्यक्ती सतत मानसिक थकव्यामुळे झोप न येणे, अंगात जडपणा, भूक न लागणे अशा समस्यांनी त्रस्त असते.
5. स्वतःपासून दुरावलेपण. स्वतःच्या भावना समजत नाहीत, जगाशी आणि नात्यांशी दूर झाल्यासारखं वाटतं.

मग मानसशास्त्रीय कारणेही आहेत.

१. दीर्घकाळ चालणारा ताण (Chronic Stress). काम, नातेसंबंध किंवा आर्थिक अडचणींमुळे मानसिक थकवा वाढतो.
2. बालपणीचे अनुभव: बालपणी वारंवार नाकारले जाणे, टीका होणे किंवा भावनिक आधार न मिळणे.
3. जेव्हा व्यक्तीला वाटतं की ती सर्व काही नियंत्रित करू शकते, आणि परिस्थिती तशी राहत नाही, तेव्हा ती मानसिकदृष्ट्या कोसळते.
4. नकारात्मक विचारांचे चक्र: “मी काहीच करू शकत नाही” — हा विचार हतबलतेच्या मुळाशी असतो.

हतबलतेच्या क्षणी व्यक्तीचा “ego” (मीपण) कमकुवत होतो आणि “superego” (आत्मिक टीकाकार) त्यावर वर्चस्व मिळवतो. यामुळे व्यक्ती स्वतःला दोषी मानते आणि वास्तवापासून दूर जाते.
वारंवार अपयशानंतर व्यक्ती असे शिकते की प्रयत्न करून काहीही साध्य होत नाही. म्हणून ती पुढे प्रयत्नच करत नाही.

हतबलतेतून बाहेर पडण्याचे मार्ग आहेत. त्यासाठी मनापासून प्रयत्न हवेत.

1. वास्तव स्वीकार. परिस्थितीवर रागावण्यापेक्षा ती जशी आहे तशी स्वीकारा.
2. लहान निर्णयांपासून सुरुवात करा: छोटे यश आत्मविश्वास वाढवते.
3. मन मोकळं करा. जवळच्या व्यक्ती, समुपदेशक किंवा मानसोपचार तज्ज्ञाशी बोला. काही गोष्टींना ठीक होण्यास वेळ लागतो.
4. ताण नियंत्रित करण्याच्या पद्धती. श्वसनक्रिया, ध्यान, योग, लेखन यांचा उपयोग करा.
5. आपल्या जीवनाला नव्याने अर्थ देणारे काम, छंद किंवा सामाजिक कार्य अंगीकारा.
6. सवयींमध्ये बदल करून सकारात्मक लोकांमध्ये राहून इतरांबरोबर तुलना न करणं.

हतबलता ही कमजोरी नाही, तर ती एका भावनिक ओझ्याची परिणामकारक प्रतिक्रिया आहे. या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी स्वीकृती, मदत आणि आत्मविश्वास आवश्यक आहेत. प्रत्येक व्यक्तीमध्ये संकटांवर मात करण्याची अंतर्गत शक्ती असते; फक्त तिला जागवण्याची गरज असते.

Leave A Comment

call us